लातूर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं आज (१२ डिसेंबर) सकाळी लातूर येथे निधन झालं आहे. ते ९१ वर्षांचे होते. लातूरमधील त्यांच्या देवघर या निवासस्थानी सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाढत्या वयानुसार असलेल्या दीर्घ आजारपणामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते.
शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत देशातील अत्यंत प्रतिष्ठित पदे भूषवली आहेत. त्यांनी लोकसभेचे सभापती (स्पीकर) म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तसेच, केंद्र सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री यासह विविध महत्त्वपूर्ण मंत्रीपदांवर काम केले होते. देशाच्या संवैधानिक प्रक्रियेत त्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण होता.
लातूरचे सात वेळा खासदार
लातूरमधील चाकूर येथील मूळ रहिवासी असलेले शिवराज पाटील चाकूरकर हे मराठवाडा आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे एक प्रभावी आणि महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघाचे सात वेळा यशस्वीपणे प्रतिनिधित्व केले होते, ज्यामुळे या मतदारसंघावर त्यांची मोठी पकड होती. २००४ मध्ये लोकसभेत पराभव झाल्यानंतरही, काँग्रेस पक्षाने त्यांच्या अनुभवाचा आदर करत त्यांना राज्यसभेवर पाठवले होते आणि त्यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती.
राजकीय वर्तुळात शोककळा
शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे आणि देशाच्या राजकारणाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच काँग्रेस पक्षासह सर्व राजकीय पक्षांतील नेत्यांनी आणि त्यांच्या संघटनेतील कार्यकर्त्यांनी तीव्र दुःख व्यक्त करायला सुरुवात केली आहे.